शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

जुने जाऊ द्या मरणालागुनी…….
महाराष्ट्राला विचारांची थोर परंपरा आहे. अनेक वर्षे महाराष्ट्राने देशाचे वैचारिक नेतृत्व केले आहे. संत परंपरा, देशाच्या स्वतंत्र लढ्याचे नेतृत्व, पुरोगामी विचारांची चळवळ, समाजप्रबोधनाच्या चळवळी,  महापुरुषांनी दिलेले वैचारिक योगदान, स्वातंत्रोत्तर कालखंडातील सहकार चळवळ, देशाच्या पुरोगामी अन प्रतिगामी विचाराचे व चळवळीचे   नेतृत्व करणे, आत्यंतिक कडवे डावे व त्याचवेळी खुल्या अर्थवयवस्थेचे खणखर समर्थक अशे  अनेक विरोधाभास महाराष्ट्राने जोपासले  आहेत . या चांगल्या  परंपरा प्रमाणे  महाराष्ट्रातील समाजघटकांकडून खुपमोठ्या ऐतिहासिक चुकाही झाल्या आहेत. अन्याय, अत्त्याचार, अन शोषण इ. चा क्लेशदायक कालखंडही मराठी माणसाने अनुभवाला आहे , अशा क्रूर घटनांनी महाराष्ट्रातील समाजमन अनेकवेळा गलीतगात्र अन छिन्नविछिन्न झाले आहे.
परंतु हेही वास्तव आहे की  इतिहासातील जुन्या गोष्टीचा तोच तो पणा माणसाला प्रगती पथाकडे नेऊ  शकत नाही. नीटपणे समजून घेतले असता असे लक्षात येते की आज ही मराठी मन इतिहासातील खोटे दाखले, परंपरेने व जन्माने मिळालेले मोठेपण, चांगल्या वाईट परंपरा, गतजीवनात भोगलेले अन्याय-अत्याचार  व हाल-अपेष्टांच्या निबिड वैचारिक अरण्यात अडकल्याचे जाणवते. भूतकाळातील आभासी जगात रममान होणे, गतकाळातील वेदनांच्या आठवणीत  अडकणे यामुळे कोणत्याही समाजाचे भविष्य उज्वल होऊ शकत नाही. ऐतिहासिक वारसा, भूतकाळात केलेल्या चुका या पासून धडा घेऊन त्यात कठोर अशा सुधारनां करून समाज उन्नतीसाठी, पुढे जाण्यासाठी  उन्नत विचारांचा व समन्वयाचा मार्ग शोधणे अत्यंत्यिक आवश्यक असते. अशाच प्रकारे एक अत्यंत विषम सांस्कृतिक वारसा व संघर्षाचा इतिहास असणाऱ्या समाजाने एकात्म होऊन नवीन मानवी संस्कृतीचा पाय घालत अमेरिकन समाजाने सारखे एक बलाढ्य व समृद्ध राष्ट्र उभा केले आहे.
मानवी समूहांची शक्ती ही माणसाच्या एकूणच प्रगतीसाठी आवश्यक असते. मानव समूह नेहमीच गुणदोष युक्त राहिला आहे. दोष दूर करून नव्या काळाच्या मानवी गुणांसह मानव व निसर्गाच्या सहअस्तित्वसाठी सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे. परंतु आज धर्यहीन, अनुत्साही, ढोंगी, स्वार्थी मंडळी आपल्या व्यक्तिगत आशाआकांक्षा साठी समाज विघातक, फुटीरतावादी व द्वेषमूलक असे नेतृत्व समाजाच्या सर्व आघाड्यावर प्रस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि  त्यामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक नेतृत्वाचा वारू आपल्याला भटकलेला दिसतो आहे. थोर साहित्यिक व विचारवंत रा. ग. जाधव यांनी एके ठिकाणी असं लिहिलं आहे की, "मानव्याचे अन संस्कृतीचे मूल्यभान बाळगणाऱ्या कुणाही व्यक्तीला वैफल्यग्रस्त करणारी ही परिस्थिती आहे. अशा वेळी  समजतील  सर्व सृजनशील, मानवतावादी व्यक्तींनी याचा गांभीर्याने विचार करून समाजमनाला  विविधतेसह सहअस्तित्वासाठी जाणीव पूर्वक तयार करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्राणी-वनस्पती समूह असो वा मानवी समूह, विविधता हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. सहअस्तित्व हा निसर्गाचा महत्वाचा गुण  आहे.  एखादा विचार, संस्कृती किंवा राज्यकर्ता घटक जेव्हा व्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्यावर निर्बंध आणतो त्या वेळी समाजाने विचारशील होऊन सक्रिय पने कार्य करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासाठी संत ज्ञानेश्वरांचे "पसायदान" एक लोकशिक्षणासाठी  सांस्कृतिक ठेव आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राने समाजाचे नेतृत्व करण्यासाठी जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या या कवितेत मार्ग शोधावा असे वाटते…
                                        नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
                                        घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते...
                                        आता इथे ऊजाडे ज्ञानाची पहाट
                                          नव्या माणसांची इथून निघे पायवाट
                                                        ------- बाबा आमटे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा